लोकव्रत प्रकाशन

front
Gaban Gaban

स्पंदन

Back

link to share : lokvrat.in/10132

Availability : Available

Author : - मोहिनी घारपुरे देशमुख

Original Author : मोहिनी घारपुरे देशमुख

Pages : 66

Category :

Price : Rs.125


To Pay : Rs. Rs.125



Write your Own review

author

"गोष्ट' ते "कथा' हा खरंतर फार मोठा प्रवास आहे. प्रत्येकच लेखकाने हा प्रवास विविध पातळ्यांवर केलेला असतो. मी देखील केलाय. शुद्ध मन ठेवून वाटेत येणारे सगळे खाचखळगे आणि कधी अनपेक्षित क्षणी आलेलं सुख यांच्या झुलत्या हिंदोळ्यावर, कधी मनासारखं जगत, तर कधी दुसऱ्याचं मन जपत, जगताना वाटेत मला "कथांचा गाव' लागला. या कथा सुचण्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. कधी जीवनानुभव आहेत, तर कधी आजवरच्या जगण्यात सापडलेले काही छोटे दुवे पुढे नेताना त्याची कथा गुंफणं मला शक्य झालं आहे. या कथा माझ्या-तुमच्या जगण्यातल्या आहेत. शहरी उच्चभ्रू वर्गातील माझ्यासारखी मुलगी जीवनाच्या रेट्यात आयुष्याचे असंख्य चढउतार झेलताना कोलमडून पडली नाही, तर त्या माझ्या जगण्याच्या, माझ्या कोऱ्याकरकरीत अनुभवांच्या मी कधी कविता केल्या, कधी कथा केल्या नि कधी सोशल मीडियावर स्पष्ट लिहिती झाले. कधी ब्लॉगच्या रूपात, तर कधी फेसबुकच्या पोस्टच्या रूपात मी लिहीत राहिले. पूर्वी निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून बातमीदारी ते संपादिका एवढा मोठा पल्ला गाठण्यासाठी मी तास न् तास लेखन केलेलं आहे. गेली तब्बल वीस वर्ष वा त्याहून अधिक काळ मी सातत्याने काही ना काही लिहीत आलेली आहे. कधी स्वतःसाठी, कधी दुसऱ्यांसाठी... कारण एकच, लेखनकलेवर असलेलं सर्वात जास्त प्रेम. साहित्य तुम्हाला जगण्याचा आधार देतं, जगण्याचं कारण देतं, समविचारी असो किंवा भिन्नविचारांचे असो पण जपून ठेवावं असं मैत्र देतं, मनाच्या खोल खोल तळाशी तुम्हाला सतत घेऊन जातं नि स्वतःची स्वतःला पुन्हा नव्याने ओळख करून देण्याचं कारणही बरेचदा साहित्यच ठरतं. भाषा आली, संवाद करता आला तरीही अभिव्यक्ती गवसतेच असं नाही. ती गवसण्यासाठी आपल्याला साहित्याच्या विश्वातच रममाण व्हावं लागतं. "मी कोण आणि माझं जगण्याचं कारण काय?' या दोन प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही शोधत असाल, तर जरूर या वाटेने पुढे चालत या. तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं तुम्ही जगात शोधताय, माणसांना विचारताय, तिचा थेट तळ तुम्हाला साहित्यात रमताना मिळेल. मी जेव्हा आयुष्याची वाट चुकते किंवा हरवते तेव्हा तेव्हा मी पुस्तकांच्या राज्यात परत येते. लिहिते, वाचते, कविता म्हणते, गाणी म्हणते, चित्रपट बघते आणि पुन्हा छान, सुंदर मैत्र शोधते. या जगण्यातच फुलपाखरांप्रमाणे मला कधीकधी कथा, कविता सापडतात. लहानपणी माझ्या घराच्या मागच्या बाजूला पावसाळ्याच्या दिवसात भलंमोठं काँग्रेसचं गवत उगवत असे. पावसाला जरा उघडीप मिळाली की, मी या गवतातून निघालेल्या पायवाटेने धावत सुटे... का माहितीये? त्या गवतात खूप फुलपाखरं भिरभिरताना दिसत. एक ते टिपिकल पिवळ्या रंगाचं फुलपाखरू, एक ते केशरी-पांढरं आणि त्यावर सुंदर छोटे छोटे काळे ठिपके असलेलं फुलपाखरू, मध्येच एखादं राखाडी रंगाचं छोटंसं फुलपाखरू आणि मध्येच एखादं निळं-जांभळं मोठं फुलपाखरू... ती फुलपाखरं अलगदपणे दोन बोटात पकडायला अवखळ वाऱ्यावर स्वार होऊन स्वतःचा विचारही न करता धावत सुटायचं. मग अलगद पुढे सरकत, क्षणभर श्वास रोखून धरत आणि गवतावर पायाचा आवाजही होऊ न देता खाली वाकायचं आणि त्या जादुई रंग ल्यालेल्या चिमुकल्या फुलपाखराला क्षणात दोन सेकंदासाठी पकडायचं आणि मग लगेच पुन्हा त्यांना सोडून द्यायचं... आपल्या बोटावर त्या फुलपाखराचे रंग जसेच्या तसे उमटलेलं पाहताना कोण आनंद होत असे. अगदी तसाच आनंद आज या माझ्या पहिल्या कथासंग्रहाच्या मूर्त रूपात अवतरण्याने मला झालाय. यातल्या एकूण एक कथा म्हणजे मला जगताना सापडलेली निरनिराळ्या रंगांची फुलपाखरंच जणू! मला खात्री आहे ही माझी कथारूपी फुलपाखरं तुमच्या मनःपटलावर निश्चितच आपले रंग कायमस्वरूपी उमटवून जाण्यात यशस्वी ठरतील. हा माझा पहिला-वहिला कथासंग्रह श्री गणेशाचरणी, श्री सरस्वती मातेच्या चरणी आणि आमच्या कुलदेवतांच्या चरणी अर्पण. आणि माझ्या समस्त वाचकांना आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाकरिता माझ्याकडून सप्रेम सादर. धन्यवाद! -मोहिनी घारपुरे-देशमुख

जीवनाच्या प्रत्येक क्षणात एक अदृश्य, लपलेली लय आहे. कधी ती लेखणीच्या श्वासातून जाणवते, कधी लेखणीच्या हृदयाच्या धडधडीतून ऐकू येते, तर कधी आठवणींच्या ओलसर पानांतून हलकेच कळीसारखी उमलत जाते. लेखणीलाही एक "अनाहत नाद' असतो. लेखिका मोहिनीजी घारपुरे यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या "स्पंदन' या कथासंग्रहातून हीच लय अनुभवायला मिळते. यातल्या कथांमधील प्रसंगांची मांडणी लक्षवेधी ठरते. जीवनाच्या श्याम-धवल बिंदूंना लेखणीने नाजूक स्पर्श केला आहे. म्हणूनच या संग्रहाचं नावच जणू पुस्तकाचं लाक्षणिक रूप आहे. साहित्याची खरी ताकद ही मनुष्याला परानुभूतीनेच नव्हे, तर आत्मानुभूतीने स्वतःजवळ नेण्यात असते. अन्य कोणीतरी लिहावे आणि त्यामधे आपले प्रतिबिंब दिसावे म्हणजे माणूस साहित्याच्या आरशात स्वतःचेच रूप ओळखतो. 'स्पंदन'मधील प्रत्येक कथेत वाचकाला स्वतःचीच पाऊलवाट दिसते. रमण-रमा यांच्या प्रेमातला धीर असो, चाकाच्या खुर्चीत बसूनही नृत्याचे स्वप्न पाहणारी स्त्री असो किंवा आईच्या मायेने थकलेल्या जीवाला शांत करणारा स्पर्श असो, ही सगळी माणसे आपल्याला परिचित आहेत. त्यांची कथा वाचताना आपणच ती जगत राहतो. ‘महालक्ष्मीचा फेरा’ ही कथा सण-समारंभांच्या नावाखाली स्त्रियांवर येणाऱ्या कामाच्या ताणाची गोष्ट सांगते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या सुनेची घुसमट आणि तिला नवऱ्याने दिलेला भावनिक आधार, हे चित्रण अतिशय संवेदनशील आहे. ही कथा 'सूनेची व्यथा थेट मनाला भिडेल अशा पद्धतीने मांडते. ‘साद’ ही कथा आजच्या तरुण पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करते. इथे 'बोल्ड' असण्याची खरी व्याख्या समजते. केवळ बाह्यरूपाने दिसणारा आत्मविश्वास आणि संकटाच्या क्षणी दाखवावी लागणारी खरी हिंमत, यातला फरक गार्गीच्या पात्रातून स्पष्ट होतो. ही कथा वरवरच्या मैत्रीवर आणि स्वार्थासाठी भावनांशी खेळणाऱ्या वृत्तीवर कठोरपणे बोट ठेवते. ‘हिरवा चाफा’ ही कथा नात्यातला गोडवा आणि रोमान्स कसा टिकवून ठेवावा हे शिकवते. लग्न होऊन अनेक वर्षे झाली तरी नात्यातील ताजेपणा एका साध्या, छोट्याशा हिरव्या चाफ्याच्या फुलातून कसा टिकून राहतो, हे लेखिकेने हळुवारपणे आणि काव्यात्मक भाषेत मांडले आहे. ही कथा नात्यातल्या भावनिक गुंतवणुकीचं आणि चिरंतन प्रेमाचं महत्त्व सांगते. ‘गिफ्ट’ ही कथा मैत्री आणि प्रेम केवळ प्रत्यक्ष भेटीगाठींवर अवलंबून नसतं, तर ते मानसिक आणि भावनिक जोडणीवर आधारलेलं असतं हे दाखवते. सोशल मीडियातून तयार झालेलं अनोळखी नातं, पण त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना किती प्रामाणिक असू शकतात, हे अवंतिका आणि सोम यांच्या गोष्टीतून जाणवतं. ही कथा माणुसकी आणि संवेदनशीलतेवरचा आपला विश्वास अधिक घट्ट करते. लेखिकेचे वैशिष्ट्य असे की, त्या घटना सांगत नाहीत, तर त्यात दडलेली भावना उलगडतात. "प्रेमा तुझा रंग कसा?' ही कथा वाचताना लक्षात येते की, प्रेमाचा रंग डोळ्यांनी दिसत नाही, तो हृदयातून खोल कुठेतरी जाणवतो. दृष्टी हरवलेल्या रमणला समाजाने अंध म्हटले; पण लेखिकेच्या लेखणीत तो जीवनाचा दीपस्तंभ ठरतो. रमा ज्या क्षणी म्हणते, "प्रेम हे मनाच्या खोल खोल तळातून उमलतं', त्या क्षणी वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, खरेच, प्रेमाचा रंग कोणता? उत्तर मात्र स्पष्ट आहे. प्रेम म्हणजे प्रकाश, ज्यात सर्व रंग सामावलेले आहेत. तसेच "मनमोर' ही कथा वाचताना जाणवते की, मानवी इच्छाशक्ती कधीही अपंग नसते. देहाला मर्यादा असल्या तरी मनाला नाहीत. नऊवारी नेसून नाचण्याचे स्वप्न पाहणारी नायिका आशयाच्या सौंदर्याला नवे तेजोवलय देते. मोहिनीजी तिला फक्त हळव्या स्वरात रंगवत नाहीत, तर तिच्या जिद्दीला गगनभरारी देतात. "स्पर्श' या कथेत मानवी नात्यांची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. आईच्या कडेवर तान्ह्या मुलाला मिळालेला स्पर्श, पती-पत्नीच्या नात्यातील जाणीव आणि समाजातील मानहानी करणारा अवांछित स्पर्श, हे सगळे अनुभव वेगवेगळ्या छटा घेऊन येतात; पण कथा निराशेवर थांबत नाही. उलट ती सांगते की, स्पर्शाचे खरे सामर्थ्य माया, जिव्हाळा आणि परस्पर काळजी यात आहे. राखीच्या धाग्यात गुंफलेली बहिणीची भावना "ओवाळणी'मध्ये झळकते. येथे लेखिका सांगते की, नात्यांच्या गाभ्यात अपेक्षा नसून, मायेचा ओलावा असतो. मोठ्या भावाची ओवाळणी नाही मिळाली तरी बहीण स्वतःच देवाला राखी बांधते. हा प्रसंग वाचताना डोळ्यांत पाणी आले; पण त्याचबरोबर अंतःकरणात कृतज्ञतेचा झरा उगम पावला. ‘भ्राता हि जीवनं नारीणाम्’ हे संस्कृत वचन बहिणीच्या भावनिक नात्याला अधोरेखित करते. मोहिनीजींच्या लेखणीत या बहिणीच्या मायेची ओल वाचकाच्या हृदयाला स्पर्श करते आणि पाझरत राहते. आधुनिक काळातील नात्यांच्या छटा "रोहिणी' या कथेत खुलतात. समाजकार्याच्या नावाखाली मोहक भास निर्माण करणाऱ्या सत्यवर्धनच्या प्रेमात पडलेली रोहिणी जेव्हा स्वतःची ओळख शोधायला लागते, तेव्हा तिच्यातून उभा राहतो तो नव्या पिढीचा प्रश्न! इथे लेखिका नकारात्मकतेत रमत नाहीत, तर रोहिणीला सकारात्मकतेचा नवा मार्ग देतात. त्या म्हणतात, “चारित्र्य म्हणजे फक्त देह नाही.” या वाक्याचा अर्थ खूपच व्यापक आहे. या वाक्यातून लेखिका एका स्त्रीच्या आत्मसन्मानाला नवीन दिशा देतातच पण एक नवी दृष्टीसुद्धा त्या प्रदान करतात. "उमंग' ही कथा तर जिद्दीच्या शिखरावर नेणारी आहे. ॲसिड हल्ल्यात विद्रूप झालेली निशा जेव्हा नव्या नजरेने जीवनाकडे पाहते, तेव्हा ती सावित्रीबाईंच्या वचनाला मूर्त रूप देते. ‘आकाशाएवढी उंच भरारी घ्या... अडथळ्यांना न घाबरता.’ निशा तिच्या वेदनांना झुगारून देऊन स्वतःच्या जिद्दीचा झरा शोधते. ही कथा वाचकाला फक्त प्रेरणा देत नाही, तर जगण्याचे नवे तत्त्वज्ञान देते. दुःखाच्या सावलीतही उभे राहणे शक्य आहे, कारण मनाची ताकद नेहमी देहापेक्षा अधिक असते. या सर्व कथांचा एकत्रित अनुभव घेताना वाचकाला जाणवते की, मा. मोहिनी घारपुरे यांची लेखणी नुसती शब्दांची वीण जपत नाही, तर ती मानवी मनाचा ठाव घेते. त्या प्रत्येक कथेला अशा स्वरूपात रंगवतात की, ती कथा वाचकाच्या आयुष्यातील एखाद्या कोपऱ्याशी जुळते. हेच खरे साहित्याचे वैशिष्ट्य आहे. ते आपल्याला स्वतःकडे परत नेणारे असते. या कथासंग्रहात कधी प्रेमाचा, कधी धैर्याचा, कधी जिद्दीचा, कधी मायेचा अविष्कार दिसून येतो. म्हणूनच हा संग्रह वाचताना मन भारावून जाते. मोहिनीजींच्या कथा या सख्याच्या भावनेतून फुलतात आणि वाचकाला त्या अनुभवाचा साक्षीदार बनवतात. लोकव्रत प्रकाशनाला हा संग्रह प्रकाशित करण्याचा आनंद तर आहेच; पण साहित्याने फुललेल्या अवघ्या साहित्यसृष्टीचाही हा आनंद आहे. मोहिनीजी घारपुरे यांचे लेखन वाचकाच्या मनात नवीन विचार, नवीन आशा, नवीन रंग पेरणारे आहे, याची खात्री आहे. हे पुस्तक हाती घेतलेल्या प्रत्येक वाचकाला आपल्या समाजाचे स्पंदन, कधी काही कथांतून आत्मप्रतिबिंबही जाणवेल. कारण हीच स्पंदने ऐकणे हे या कथासंग्रहाचे यश आहे. मोहिनीजींना पुढील लेखनासाठी लाख लाख शुभेच्छा! -लोकव्रत प्रकाशन, पुणे