लोकव्रत प्रकाशन

front
Gaban Gaban

शेगावीचा राणा

Back

link to share : lokvrat.in/10126

Availability : Available

Author : -विजया ब्राह्मणकर

Original Author : -विजया ब्राह्मणकर

Pages : 222

Category :

Price : Rs.350 250


To Pay : Rs. 250



Write your Own review

author

"शेगावीचा राणा' श्री संत गजानन महाराज म्हणजे भक्तांचे श्रद्धास्थान आणि गजानन महाराज पंढरपूरच्या पंढरीनाथाचे भक्त! कुठलाही गाजावाजा न करता मूकपणे भक्ती कशी करावी हे गजानन महाराज कृतीतून सांगतात. अन्न परब्रह्म आहे आणि परमेश्वर चराचरात आहे हे न बोलता गजानन महाराज आपल्या कृतीतून दाखवून देतात. माझी संत गजानन महाराजांवर खूप श्रद्धा आहे. अनेकदा दासगणूकृत "श्री गजानन विजय ग्रंथ' वाचला आहे आणि जितक्यांदा पोथी वाचली तितक्यांदा महाराज नव्याने उमजत गेले. पोथीत असणार्‍या व्यक्तिरेखा कळत गेल्या. एक लक्षात आले की, ज्या बंकटलालाच्या घरी गजानन महाराज राहिले त्या बंकटलालाच्या आईचा सबंध पोथीत कुठेही साधा उल्लेख नाही की, जिने घरी येणार्‍या भक्तांचे सारे अगत्याने केले, महाराजांना दाखवल्या जाणार्‍या विविध नैवेद्याची स्वतः खपून तयारी केली, त्या बंकटलाच्या आईचा कुठेही उल्लेख नाही. तसेच महाराजांना निखारे नाकारणाऱ्या जानकीराम सोनाराच्या पत्नीचाही कुठे उल्लेख नाही. या निसटलेल्या व्यक्तिरेखांना समोर आणून न्याय द्यायचा होताच, तरीही मुख्यत्वाने महाराजांवरील श्रद्धा, भक्ती "शेगावीचा राणा' लिहिण्यास कारणीभूत झाली. जेव्हा लिहायचे ठरवले तेव्हा काही जणांशी बोलले; पण साऱ्यांचा सूर एकच की, "पोथीत तर सारे आले आहे, मग कादंबरीत वेगळे काय येणार?' त्यांचेही बरोबर होते; परंतु पोथी ओवी स्वरूपात आहे. तिचा थाट वेगळा आहे आणि कादंबरीचा घाट वेगळा आहे. कादंबरी वाचताना आपण थेट त्या पात्रांशी भावनिकरीत्या जोडले जातो. पोथीचा दस्तऐवज वेगळा आणि कादंबरीचा अगदीच वेगळा. पोथीत असलेल्या व्यक्तिरेखा आणि विशेषतः काही निसटलेल्या व्यक्तिरेखा चैन पडू देईना. तेव्हा मग "शेगावीचा राणा' ही कादंबरी लिहिल्या गेली. LAD काॅलेजच्या उपप्राचार्या राधिका एल्कावार ह्यांनी स्वतःजवळचा संत दासगणू विरचित "श्री गजानन विजय ग्रंथ' मला उपलब्ध करून दिला त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. लोकव्रत प्रकाशनच्या प्रकाशक ॲड. वर्षा माडगूळकर ह्यांनी पुस्तकप्रकाशनाची जबाबदारी घेतली आणि सचिव मा. डॉ. शिरीष कुळकर्णी ह्यांनी ती स्वीकारली. त्या दोघांचेही मनःपूर्वक आभार. कादंबरीबाबत अधूनमधून चर्चा करणार्‍या माणिक घारपुरे आणि टंकन करणारे श्री. विनायक गोरे आणि पुस्तकनिर्मितीत सहभागी असणाऱ्या भैरवी देशपांडे, आपणा सर्वांचे मनापासून आभार. नेहमीप्रमाणे रसिक वाचक "शेगावीचा राणा'चे स्वागत करतीलच. त्यासाठी रसिक वाचकांचे मनापासून आभार. सस्नेह, -विजया ब्राह्मणकर

शेगावीचा राणा: भक्तांसाठी कादंबरीरूपी महाप्रसाद! अतिप्राचीन काळी शृंगमुनींनी वसवलेले शेगाव हे परब्रम्हस्वरूप संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने, पदस्पर्शाने परिस झाले. आजवर गजानन महाराजांच्या भक्तीपर अनेकविध काव्य, लेख, पुस्तके, आरत्या प्रकाशित झाल्यात; पण कादंबरी लिहिण्याचे महद‌्भाग्य मा. विजयाताई ब्राह्मणकरांना लाभले. लेखणीद्वारे परब्रम्ह सद्गुरू चैतन्यपुरुष श्री गजानन महाराजांवरची कादंबरी म्हणजे भक्तांसाठी महाप्रसाद आहे. या ग्रंथाद्वारे विजयाताईंची अक्षरसेवा घडून आली आहे. लोकव्रत प्रकाशनाचीदेखील सेवा श्री गजानन महाराजांनी स्वीकारली, हे त्यांच्यावरील भक्ती आणि सेवेतून प्राप्त झालेल्या पूर्वपुण्याईमुळेच! काही संकेत निराळे असतात. अर्थाच्या पलीकडचे असतात. याआधीही ईश्वराने अशीच सेवा करून घेतली. 'परब्रम्ह'- संत निवृत्तीनाथांवरील पहिली कादंबरी, 'संतसाम्राज्ञी'- संत मीराबाईवरील कादंबरी, 'क्रांतीब्रह्म'- संत एकनाथांवरील कादंबरी प्रकाशित करण्याचे सामर्थ्य लोकव्रतला लाभले. हे भाग्य सामान्य नाही. लोकव्रत प्रकाशनानेही ही सर्व पुस्तके तितक्याच श्रद्धेने प्रकाशित केलीत. गजानन महाराजांचे 'श्री गजानन विजय' वाचून आलेली तृप्ती माझ्यासह लक्षावधी श्रद्धाळूंनी अनुभवली. मात्र प्रत्यक्ष योगीराज परब्रह्म सद्‌गुरू गजानन महाराजांवर कादंबरी व्हावी ही त्यांचीच इच्छा आणि कृपा ! एक प्रकारे विजयाताई ब्राह‌मणकरांच्या लेखणीवर महाराजांचीच कृपा झाली असल्याचा प्रत्यय कादंबरी वाचताना अनेकदा येतो. महाराजांचा 'पिठलं भाकरी मिरची'चा प्रसाद अनुभवल्यानंतर पवित्र मनाने पाण्याचा घोट घेतल्यावर जसे दैवी, ईश्वरी कवच प्राप्त झाल्याचे समाधान प्राप्त होते तसा अनुभव ही कादंबरी वाचताना येतो. दुःखांना व्यापून टाकणाऱ्या मानवी आयुष्याला दिशा दाखवणारे प्रत्यक्ष सद्गुरू दुःखहरण करण्यासाठी जन्म घेतात. कलियुगातही आपला हात ईश्वराच्या हातातून ते सुटू देत नाहीत. त्यांचे स्मरण हे शुभंकरोतीसमान आल्हाददायी असते. ईश्वराचे निर्गुण रूप आपल्या सामान्य दृष्टीला सहज समजत नाही म्हणून सद्गुरू सगुण रूपात जन्म घेतात. श्री गजानन महाराज भक्तांच्या योगक्षेमाची आजही काळजी घेत असतात. याच जन्मातील नव्हे तर जन्मजन्मांतरीचा अंधकार दूर करण्यासाठी सद्गुरूंचे स्मरण अनिवार्य आहे. सद्गुरूंची अनेक रूपे आहेत. त्यांची कृपेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. द्वैताची समाप्ती हे भक्तांचे जीवनध्येय होणे गरजेचे असते; पण ते होताना 'श्री गजानन, जय गजानन', 'गण गण गणात बोते' म्हणता म्हणता स्वतःचा विसर पडू लागतो. ही सद्गुरूंचीच कृपा! या कृपेचा लाभ लक्षावधी भक्तांना झाला आहे. कलियुगातला मानवधर्म श्रद्धा, भक्ती, कर्तव्य आणि जन्माचे कारण विसरू लागला आहे. मानवधर्म जपण्याचा आणि मानवी जन्म घेण्याचा हेतू साध्य करण्यासाठीदेखील एकट्यानेच प्रवास करावा लागतो. मात्र जर सद्गुरूंवर आपली अपार, अनिवार श्रद्धा असेल, तर त्या श्रद्धेमुळे एकटेपणातील द्वैताचे, अद्वैत होऊन श्री गजानन महाराज आपली सोबत करतात, हाही लाखो भक्तांचा अनुभव आहे. काहीच न मागता फक्त देणारे असे श्री गजानन महाराज आपल्या सर्वांच्या जगण्याचा आधार होतात. या कादंबरीतून गजानन महाराजांचा साक्षात्कार होतो. ही कादंबरी वाचताना आत्मसाक्षात्कारदेखील होतो. श्री गजानन महाराजांची ही सेवा त्यांचे चरणी श्रद्धापूर्वक अर्पण करताना ही सेवा घडवून घेतल्याबद्दल त्यांचेच चरणी हे शरणसमर्पण करीत आहोत. रसिक वाचकांना हा महाप्रसाद आवडेल याची खात्री आहे. 'न्यून ते आमच्याकडे, उत्तम ते समर्पण' या भावाने हे पुस्तक प्रकाशित करताना धन्यता आणि आनंद होत आहे. जय हिंद! -डाॅ.शिरीष कुलकर्णी